Saturday, January 31, 2026

परिचीत

२०२२ चा मे महिना. मुंबईत उकाड्याने कहर केला होता. मरिन लाईन्सच्या अरबी समुद्रावरून येणारे वारेही जणू आज रस्ता विसरले होते. समीर, वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभा होता. अंगातल्या पांढऱ्या शर्टला घामाचे चट्टे पडले होते आणि हातातली लॅपटॉपची बॅग आज त्याला नेहमीपेक्षा जास्त जड वाटत होती. समीर, वय २७, एका जाहिरात कंपनीत 'क्रिएटिव्ह कॉपीरायटर' म्हणून काम करायचा. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यातली ती 'क्रिएटीव्हीटी' जणू कुठेतरी हरवली होती. तो स्वतःला एक 'चालती-बोलती फाईल' समजू लागला होता.

लोकल आली. गर्दीचा तोच ओळखीचा लोंढा. समीरने कसाबसा आत प्रवेश मिळवला आणि एका खांबाचा आधार घेत लटकला. त्याच्या बाजूलाच अविनाश नावाचा त्याचा सहकारी उभा होता, जो सतत फोनवर कोणाशी तरी क्लायंटच्या 'डेडलाईन्स'बद्दल वाद घालत होता.

"समीर, ऐकतोयस का? जर आज आपण हे प्रेझेंटेशन सबमिट नाही केलं, तर बॉस आपल्याला जिवंत सोडणार नाही!" अविनाश ओरडत होता.

समीरने फक्त मान हलवली. त्याचं लक्ष अविनाशच्या बोलण्यापेक्षा बाहेरून वेगाने मागे जाणाऱ्या इमारतींकडे होतं. तो विचार करत होता— हेच का आयुष्य? सकाळी जाग आल्यापासून झोपे पर्यंत फक्त ऑफिस, assignment, project, presentation, दररोज सकाळी वांद्रे ते चर्चगेट, रात्री पुन्हा तोच प्रवास. शेकडो चेहरे भेटतात, पण कोणाशीच ‘संवाद’ नाही.

लोकल ग्रँट रोड स्टेशन सोडून पुढे निघाली. अचानक काही लोक उतरले आणि समीरला समोरच्या सीटवर बसायला जागा मिळाली. त्याच्या समोरच तिथे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांचं व्यक्तिमत्व त्या गर्दीतही उठून दिसत होतं. स्वच्छ पांढरी दाढी, डोळ्यांवर जाड भिंगाचा चश्मा आणि अंगात एक जुना पण इस्त्री केलेला नेहरू शर्ट. त्यांच्या हातात एक जाडजूड पुस्तक होतं, ज्याचं कव्हर पिवळं पडलं होतं.

त्यांचं नाव होतं विनायकराव.

विनायकरावांनी अचानक पुस्तक बाजूला ठेवलं आणि वर पाहिलं. त्यांची आणि समीरची नजरानजर झाली. विनायकरावांच्या चेहऱ्यावर एक असं स्मित उमटलं, जणू काही ते समीरला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होते. ते हसू उपरोधिक नव्हतं, तर त्यात एक प्रकारची 'आश्वस्तता' होती.

समीरला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याला ती विचित्र भावना जाणवली  "अरे, या माणसाला मी आधी कुठेतरी पाहिलंय का?" त्याच्या डोळ्यांसमोर काही अस्पष्ट चित्रं नाचू लागली एक जुनं ग्रंथालय, पावसाची रिपरिप आणि कोणाशी तरी केलेली तासनतास चर्चा. पण हे सगळं कधी घडलं? समीरला तर आठवत नव्हतं.

समीरने संकोच सोडून विचारलंच, "काका, माफ करा... पण आपण आधी भेटलो आहोत का? तुमची ओळख अवघ्या पाच मिनिटांची आहे, पण मला असं खूप प्रकर्षाने वाटतंय की मी तुम्हाला कित्येक वर्षांपासून ओळखतोय."

बाजूला उभा असलेला अविनाश फोन बाजूला ठेवून समीरकडे वेड्यासारखा बघू लागला. "काय रे समीर? उन्हाचा फटका बसलाय का तुला? कोणालाही काय विचारतोयस?"

पण विनायकरावांनी समीरकडे पाहून मान डोलवली. त्यांनी त्यांचं पुस्तक मिटलं. मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं— 'Psychology and the Unconscious' by Carl Jung.

विनायकराव शांत आवाजात म्हणाले, "समीर, हे काही निव्वळ योगायोग नाहीत. माणसाचं मन हे एखाद्या समुद्रासारखं असतं, आपल्याला फक्त वरच्या लाटा दिसतात, पण तळाशी काय दडलंय हे कोणालाच ठाऊक नसतं. 


ट्रेनने वेग धरला होता. विनायकराव आता समीरला नव्हे, तर त्याच्या अंतर्मनाला सांगत होते.

"समीर, कार्ल जुंग हा माझा एक आवडता 'तत्वज्ञानी' आहे. त्याने मानवी आत्म्याची अशी काही रहस्यं शोधून काढली आहेत की ती ऐकली की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो म्हणायचा की, आपल्या प्रत्येकाकडे एक वैयक्तिक मन असतंच, पण त्याखाली एक 'Collective Unconscious' (सामूहिक अबोध मन) असतं. हे मन संपूर्ण मानवजातीला एकमेकांशी जोडतं."

विनायकरावांनी समीरच्या डोळ्यांत पाहिलं. "जेव्हा तुला असा भास होतो की तू मला आधीपासून ओळखतोस, तेव्हा तुझं हे 'सामूहिक अबोध मन' जागं झालेलं असतं. आपण ज्यांना भेटतो, ते फक्त हाडामासाचे चेहरे नसतात. कधीकधी दोन आत्मे एकमेकांना अशा एका स्तरावर ओळखतात, जिथे काळ, वेळ आणि हे शरीर— यांचं काहीच बंधन नसतं."

अविनाशला हे सगळं काहीतरी 'टाईमपास' वाटत होता. तो म्हणाला, "काका, हे सगळं पुस्तकी बोलणं झालं. प्रॅक्टिकली बघा, आपण मुंबईकर आहोत. आपल्याला वेळेची किंमत आहे."

विनायकराव हसले. "अविनाश, वेळ ही देखील मनाचीच एक धारणा आहे. समीरला जे जाणवलं, ती 'Synchronicity' (समकालिकता) आहे. दोन घटना जेव्हा विनाकारण पण अर्थपूर्ण पद्धतीने एकत्र येतात, तेव्हा त्याला योगायोग म्हणता येत नाही. समीर, तुला माझ्यात तुझ्याच अस्तित्वाचा एखादा तुकडा दडलेला दिसलाय, म्हणून तुला मी ओळखीचा वाटतोय."


ट्रेन मरिन लाईन्सला पोहोचणार होती, इतक्यात अचानक ट्रेनला एक मोठा झटका बसला. लोक एकमेकांवर पडले. लाईट्स गेले आणि ट्रेन एका अंधाऱ्या बोगद्यात थांबली. लोक ओरडू लागले. बाहेर पावसाची चाहूल लागली होती, अचानक आलेल्या वादळामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता.

लोकलमध्ये अंधार होता. लोकांमध्ये घबराट पसरली होती. पण त्या अंधारातही विनायकराव शांत होते. त्यांनी आपला मोबाईलचा फ्लॅश चालू केला.

"घाबरू नका," विनायकराव शांतपणे म्हणाले. "हा काळ थांबलेला नाही, तर हा काळ आपल्याला स्वतःकडे बघण्याची संधी देत आहे."

अंधारात समीरला विनायकरावांचा आवाज अजूनच जवळचा वाटू लागला. त्याला आठवलं— लहानपणी तो एका अपघातात अडकला होता, तेव्हा एका अनोळखी माणसाने त्याला वाचवलं होतं. त्या माणसाचा चेहरा अंधुक होता, पण त्या माणसाचा स्पर्श आणि आज विनायकरावांचा आवाज यात कमालीचं साम्य होतं.

"काका," समीर चाचरत म्हणाला, "२० वर्षांपूर्वी... महाडचा तो पूल कोसळला होता... तुम्ही तिथे होता का?"

विनायकरावांनी फक्त स्मितहास्य केलं. त्यांनी उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांतली चमक सर्व काही सांगून गेली. समीरला जाणवलं की, हे नातं आजचं नाही. हे नातं त्या दिवसापासूनच जोडलं गेलं होतं, जेव्हा एकाने दुसऱ्याला जीवनदान दिलं होतं. आज फक्त त्या ऋणाची आठवण करून देणारा तो क्षण होता.

अर्ध्या तासानंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि हळूहळू चर्चगेट स्टेशनवर पोहोचली. मुंबईचा तोच आरडाओरडा पुन्हा सुरू झाला. गर्दीचा लोंढा प्लॅटफॉर्मवर उतरला.

विनायकराव उभे राहिले. त्यांनी समीरच्या खांद्यावर हात ठेवला. "काही नाती पाच मिनिटांत तयार होत नाहीत समीर, ती फक्त पाच मिनिटांत पुन्हा गवसतात. आज तुझा आणि माझा संवाद संपला नाही, तर तो एका नवीन वळणावर आला आहे. तू ज्या माणसांना 'फाईली' समजतोस, त्यांच्याकडे एकदा नीट बघ. प्रत्येकाकडे तुझं काहीतरी ऋण दडलेलं असेल."

विनायकराव गर्दीत मिसळले आणि क्षणार्धात दिसेनासे झाले. समीर तिथेच उभा राहिला. त्याच्या बाजूला असलेला अविनाश आता शांत झाला होता.

"समीर... ते काका कोण होते?" अविनाशने आश्चर्याने विचारलं.

"ते एक आरसा होते अविनाश... ज्याने मला माझंच रूप दाखवलं," समीर म्हणाला.

समीरने आज पहिल्यांदाच त्या गर्दीकडे वैतागून पाहिलं नाही. त्याने प्रत्येक चेहऱ्याकडे कुतूहलाने पाहिलं. त्याला जाणवलं की, मुंबईची ही लोकल फक्त डबे ओढत नाहीये, तर ती हजारो वर्षांचा इतिहास आणि एकमेकांशी जोडलेले आत्मे वाहून नेत आहे.

त्याने खिशातून फोन काढला आणि बॉसला मेसेज केला— "आजचं प्रेझेंटेशन मी वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. आज आपण माणसांच्या मनात शिरणार आहोत, 'प्रॉडक्ट्स' मध्ये नाही."

समीर आता स्टेशनच्या बाहेर आला. पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले होते. त्याला फेसबुक वर कोठेतरी एक वाक्य दिसले — "The meeting of two personalities is like the contact of two chemical substances: if there is any reaction, both are transformed." (दोन व्यक्तिमत्त्वांची भेट ही दोन रसायनांच्या संपर्कासारखी असते: जर काही प्रक्रिया झाली, तर दोघेही बदलून जातात.)

आज समीर बदलला होता. मुंबईच्या त्या अथांग गर्दीत त्याला आता एकटेपणा वाटत नव्हता. कारण त्याला समजलं होतं की, कदाचित या गर्दीत अजून एखादा 'जुना ओळखीचा' चेहरा दडलेला असेल, जो फक्त एका नजरेची वाट बघत असेल.

समीरच्या आयुष्यातला तो प्रवास तिथेच थांबला नव्हता. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पडल्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरींनी समीरच्या मनातील विचारांना एक नवी धुमारे फोडले होते. पण नियतीचा खेळ अजून बाकी होता. 'सिंक्रोनिसिटी'चा अनुभव त्याला पुन्हा एकदा येणार होता.

विनायकरावांना भेटून आता आठवडा उलटला होता. समीरच्या कामात आता एक वेगळीच स्पष्टता आली होती. पण एक प्रश्न त्याला सतावत होता— विनायकराव त्या महाडच्या अपघाताबद्दल काहीच का बोलले नाहीत? फक्त स्मितहास्य करून ते निघून का गेले?

त्याच शुक्रवारी समीरला ऑफिसच्या कामासाठी 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल' मध्ये जावे लागले. एका सामाजिक जाहिरातीच्या निमित्ताने तो तिथे काही डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायला गेला होता. काम संपवून बाहेर पडत असतानाच, कॅन्टीनच्या बाहेरील बाकावर त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला.

ती होती तन्वी. समीरची कॉलेजमधील मैत्रीण, जिच्याशी त्याचं बोलणं गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे तुटलं होतं. तन्वी तिथे रडत बसली होती.

समीर तिच्या जवळ गेला. "तन्वी? तू इथे, काय झाले , इथे काय करतेयस?"

तन्वीने दचकून वर पाहिलं. तिचे डोळे सुजले होते. "समीर? अरे, माझे वडील... त्यांना हार्ट अटॅक आलाय. अतिदक्षता विभागात (ICU) आहेत ते."

समीर तन्वीला धीर देऊ लागला. गप्पांच्या ओघात त्याला समजलं की तन्वीचे वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, समीरच्या आयुष्यातले तेच 'गूढ' गृहस्थ— विनायकराव होते!

समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने धावत ICU च्या काचेतून आत पाहिलं. विनायकराव तिथे मशीनच्या विळख्यात शांत झोपले होते. ज्या माणसाने आठवड्यापूर्वी समीरला जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं होतं, तोच माणूस आज मृत्यूशी झुंज देत होता.

समीरने तन्वीला विचारलं, "काका महाडच्या पुलाच्या दुर्घटनेत होते का?"

तन्वीने आश्चर्यचकित होऊन पाहिलं. "हो, तुला कसं माहीत? बाबा तेव्हा तिथे बचाव पथकात स्वयंसेवक म्हणून गेले होते. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते, पण त्या घटनेबद्दल ते कधीच कोणाशी जास्त बोलत नसत. ते म्हणायचे की, 'ज्यांचे प्राण वाचले, त्यांच्याशी माझं रक्ताचं नाही तर आत्म्याचं नातं आहे.'"

समीरला आता त्याच्या त्या शब्दांचा खरा अर्थ उमजला. "सामूहिक अबोध मन" केवळ विचारात नसतं, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणि ऋणानुबंधात असतं.

त्या रात्री समीर हॉस्पिटलमध्येच थांबला. विनायकरावांची प्रकृती खालावत होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती. समीर विनायकरावांच्या बेडपाशी गेला. त्याने त्यांचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला.

"काका, तुम्ही म्हणाला होता ना की दोन आत्मे एका स्तरावर एकमेकांना ओळखतात? मग आज असं मध्येच सोडून कसं चालेल? मला अजून खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडून," समीर पुटपुटला.

समीरने विनायकरावांच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हटलं, "काका, मी तोच समीर आहे... ज्याला तुम्ही २० वर्षांपूर्वी त्या चिखलातून बाहेर काढलं होतं."

आणि एक चमत्कार घडला. मॉनिटरवरच्या हृदयाच्या ठोक्यांच्या रेषा ज्या स्थिर होत होत्या, त्या अचानक पुन्हा नाचू लागल्या. विनायकरावांच्या हाताच्या बोटांनी समीरच्या हाताला हलकासा दाब दिला. त्यांनी डोळे उघडले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरपरिचित, शांत स्मित उमटलं.

दोन आठवड्यांनंतर, विनायकराव डिस्चार्ज घेऊन घरी आले होते. समीर आता त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाला होता. विनायकरावांच्या घराच्या बाल्कनीतून समुद्र दिसत होता. मे महिन्याचा उकाडा संपून आता पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.

"समीर," विनायकराव चहाचा कप हातात घेत म्हणाले, "जुंग म्हणायचा की, जोपर्यंत आपण आपल्या आत्म्याच्या अस्तिस्वाला स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण पूर्ण होत नाही. तू त्या दिवशी ट्रेनमध्ये मला ओळखलं, कारण तू स्वतःला ओळखायला सुरुवात केली होतीस."

समीरने विचारलं, "पण काका, तुम्ही मला ओळखलं होतं का?"

विनायकराव हसले. "मी तुला २० वर्षांपूर्वीच ओळखलं होतं, बाळा. जेव्हा मी तुला त्या ढिगाऱ्याखालून काढलं होतं, तेव्हा तुझ्या डोळ्यात जगण्याची जी जिद्द होती, तीच जिद्द मला त्या दिवशी लोकलच्या गर्दीत पुन्हा दिसली. फक्त तू त्या गर्दीत हरवला होतास."

आज समीर पुन्हा चर्चगेट लोकलमध्ये उभा होता. गर्दी तशीच होती, उकाडाही तसाच होता. पण आज समीरच्या हातात लॅपटॉप बॅग नव्हती, तर तत्त्वज्ञानाचे तेच पुस्तक होतं जे विनायकरावांनी त्याला भेट दिलं होतं.

त्याच्या बाजूला एक तरुण मुलगा वैतागून फोनवर ओरडत होता. समीरने त्याच्याकडे पाहून फक्त एक आश्वासक स्मित केलं. त्या मुलाने गोंधळून समीरकडे पाहिलं.

समीरच्या मनात विचार आला— कदाचित या मुलालाही वाटत असेल की मी याला कुठेतरी पाहिलंय. कदाचित आज मी कोणासाठी तरी 'विनायकराव' होणार होतो.

कारण नाती पाच मिनिटांत तयार होत नाहीत, ती फक्त योग्य वेळी पुन्हा गवसतात.

Thursday, January 29, 2026

मुखवट्यांच्या पलीकडे

लोअर परळच्या 'एमराल्ड हाईट्स' टॉवरची ती चकचकीत लिफ्ट १८ व्या आणि १९ व्या मजल्याच्या मध्ये अचानक एक मोठा झटका देऊन थांबली. एसीचा सुखावणारा 'हम्म' असा आवाज बंद झाला आणि त्या सहा बाय सहाच्या स्टील बॉक्समध्ये मुंबईच्या दमट उकाड्याने आणि भयाण शांततेने प्रवेश केला.

त्या एकाच लिफ्टमध्ये चार वेगवेगळ्या जगांचे प्रतिनिधी अडकले होते.

एका कोपऱ्यात रिया उभी होती. तेवीस वर्षांची, नुकतीच एमबीए झालेली. तिच्या अंगावरचं ब्लेझर तिला थोडं सैल होतं, पण तिने ते प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून अंगावर वागवलं होतं. तिच्या हातातली फाईल थरथरत होती. तिच्या मनात भीती इंटरव्ह्यू चुकण्याची होतीच, पण त्याहून मोठी भीती होती अपयशाची. तिला आजही आठवत होते ते दिवस, जेव्हा तिच्या पायात घुंगरू असायचे. ती एक उत्तम 'कथक' नर्तिका होती. पण बापाच्या एका वाक्याने "नाचून पोट भरत नाही रिया, प्रॅक्टिकल हो"—तिने घुंगरू कपाटात कोंबले आणि लॅपटॉप हातात घेतला. आज ती MBA करून त्याच 'प्रॅक्टिकल' जगाच्या दारात उभी होती, पण आतून ती रडत होती.

दुसरे होते डॉ. देशपांडे. पन्नाशी ओलांडलेले, शहरातले टॉपचे कार्डिओलॉजिस्ट. त्यांच्या मनगटावरचं रोलेक्स घड्याळ त्यांच्या वेळेची किंमत सांगत होतं. ते अस्वस्थपणे टायची गाठ सैल करत होते. कॉलेजमध्ये असताना बासरी वाजवणारे देशपांडे, गोल्ड मेडलच्या शर्यतीत असे धावले की बासरीचा सूर मागेच राहिला. त्यांनी अवाढव्य घर बांधलं, पण त्यात राहायला त्यांचा मुलगा आणि पत्नी तयार नव्हते. आज ते 'यशस्वी' होते, पण त्या लिफ्टमध्ये एकटे होते.

तिसरा होता सुरेश. एक मध्यमवयीन कारकून. अंगावर साधा, काही ठिकाणी विटलेला शर्ट. हातात बटाटेवड्याचा वास येणारी टिफिनची पिशवी. सुरेशच्या आयुष्यात १० वर्षांपूर्वी एक मोठं वादळ येऊन गेलं होतं. त्याने सुरू केलेला छोटा व्यवसाय बुडाला होता, रस्त्यावर येण्याची वेळ आली होती. त्या धक्क्यातून सावरताना त्याला नाटकाची, साहित्याची ओढ लागली. आज तो दिवसा कारकून असला, तरी संध्याकाळी एका हौशी रंगमंचावर राजाची भूमिका करायचा. त्याला गमावण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती.

आणि मध्यभागी उभी होती अंजली. चाळीशीची एक अतिश्रीमंत गृहिणी. अंगावर लाखांची शिफॉन साडी आणि गळ्यात हिऱ्यांचा हार. ती दिसताना 'मिसेस विक्रम ओबेरॉय' म्हणून दिसत होती, पण आतमध्ये ती अजूनही 'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स' ची ती जुनी विद्यार्थिनी होती, जिची आर्किटेक्ट होण्याची स्वप्नं लग्नाच्या मांडवातच जळाली होती. "आमच्या घरच्या सुना नोकरी करत नाहीत," या एका वाक्याखातर तिने आपली स्केचबुक्स रद्दीत दिली होती आणि आता ती फक्त पार्ट्यांच्या मेनू कार्डवर डिझाईन करण्यात धन्यता मानत होती.

"देवा, प्लीज नाही!" रियाचा संयम सुटला. तिने इमर्जन्सी बटण जोरात दाबलं. "माझा इंटरव्ह्यू आहे! ही संधी गेली तर माझं करिअर संपलं!"

डॉ. देशपांडे वैतागले. "शांत हो मुली. आरडाओरडा करून वीज येणार नाहीये. माझी ब्रीच कँडीला सर्जरी आहे, मी करतोय का तमाशा?"

सुरेशने शांतपणे खिशातून रुमाल काढला आणि घाम पुसला. "साहेब, मुंबईची लाईट आणि नशीब, आपल्या रागावर चालत नाही. येईल तेव्हा येईल."

रिया खाली बसली, गुडघ्यात डोकं घालून हुंदके देऊ लागली. "तुम्हाला कळणार नाही. लोक म्हणतात २० ते २५ हीच वयाची 'सुवर्णवर्षं' असतात. आत्ता नाही 'सेटल' झालो, तर आयुष्यभर स्ट्रगल आहे. मला त्या टाइमलाईनवर चालावंच लागेल."

रियाचे ते 'टाइमलाईन' आणि 'सुवर्णवर्षं' हे शब्द ऐकून शांत उभ्या असलेल्या अंजलीच्या मनात काहीतरी हललं. आज सकाळीच वाचलेला तो लेख आणि तिचं स्वतःचं २० वर्षांपूर्वीचं आयुष्य, सगळं समोर आलं.

"टाइमलाईन..." अंजली पुटपुटली. "जन्माला आल्यापासून आपल्याभोवती एक कुंपण घातलं जातं, नाही का?"

रियाने रडवेल्या डोळ्यांनी वर पाहिलं.

अंजली पुढे झाली. तिचा तो 'सोशलाईट' वागण्याचा डौल आता गळून पडत होता. "अगं, पाळण्यात असल्यापासून आपल्या कानात कुजबुज सुरू होते— 'बाळा, पळ. शर्यत लागली आहे.' आणि आपण वेड्यासारखे धावतो. कुणीतरी आखून दिलेल्या रेषेवरून."

तिने डॉक्टरांकडे पाहिलं. "मी पण हेच केलं. शिक्षण, नोकरी, लग्न... समाजाच्या त्या 'चेकबॉक्स'वर टिकमार्क करताना मी स्वतःलाच विसरले. मी आर्किटेक्ट होणार होते, माहिती आहे? जुन्या वास्तू जपणं माझं स्वप्न होतं. पण मी 'मिसेस ओबेरॉय' होणं निवडलं. तो 'लोभसपणा' एक मुखवटा होता. लोकांच्या टाळ्यांसाठी तयार केलेला प्लास्टिकचा चेहरा! त्याने मला हिऱ्यांचे दागिने दिले, पण माझी पेन्सिल आणि कागद हिरावून नेला."

डॉक्टर उपरोधाने हसले. "मॅडम, त्यालाच तडजोड म्हणतात. आणि बघा, आज तुम्ही सुखात आहात."

"सुखात?" अंजलीचा आवाज कापरा झाला. "डॉक्टर, हे सुख नाही, हा सोन्याचा पिंजरा आहे. तुम्ही सांगा, इतके मोठे डॉक्टर आहात, शेवटचं कधी मनसोक्त हसला होतात? तुमच्या त्या रोलेक्सने तुम्हाला वेळ दाखवली, पण 'जगण्यासाठी' वेळ दिला का?"

डॉक्टरांचा चेहरा पडला. त्यांना त्यांच्या कपाटातल्या धूळ खात पडलेल्या बासरीची आठवण झाली. मुलाचा वाढदिवस विसरल्यामुळे झालेला बायकोचा तो अबोला आठवला. ते गप्प झाले.

अंजली पुढे बोलत राहिली, "आज चाळिशीच्या उंबरठ्यावर मला वाटतंय, मी माझं आयुष्य जगलेच नाही. कुणी दुसऱ्याने लिहिलेल्या नाटकाची तालीम करत होते मी इतकी वर्षं. हे 'मिडलाईफ क्रायसिस' नाहीये, हा साक्षात्कार आहे. मुखवटा गळून पडताना होणारी ही वेदना म्हणजे पुनर्जन्म आहे."

तिने सुरेशकडे पाहून विचारलं, "लोक म्हणतात 'सेटल' व्हा. दादा, तुम्ही सांगा, सेटल म्हणजे नक्की काय?"

सुरेशने एक निर्मळ हसू फेकलं. त्याला १० वर्षांपूर्वीचा आपला तो पडता काळ आठवला, ज्याने त्याला जगायची खरी किंमत शिकवली होती.

"मॅडम," सुरेश म्हणाला, "साचलेलं पाणी सेटल असतं, पण त्याला वास येतो. वाहती नदी कधीच सेटल नसते, ती फक्त वाहत असते. मी आयुष्यात एकदा खूप वाईट पडलो होतो, तेव्हा कळलं की पडण्यात भीती नाही, पडून राहण्यात भीती आहे. मी आता कारकून आहे, पण संध्याकाळी मी रंगमंचावर राजा असतो. मी माझ्या अटींवर जगतो. तेच माझं यश."

रिया हे सगळं ऐकत होती. तिने विचारलं, "पण मग... आता उशीर नाही झाला?"

"उशीर?" अंजली हसली. "स्वतःच्या उणिवांवर प्रेम करायला शिकणं आणि नव्याने सुरुवात करणं, याला कधीच उशीर नसतो. मला आता 'यशस्वी' व्हायचं नाहीये, तर 'अस्सल' व्हायचंय. मला पुन्हा स्केचबुक हातात घ्यायचंय."

तेवढ्यात एसीचा आवाज आला. लाईट लागली. लिफ्ट पुन्हा सुरू झाली.

अंजली रियाकडे वळली. तिने रियाचा हात हातात घेतला. "बाळा, तो इंटरव्ह्यू दे. नोकरी कर. पण त्या नोकरीसाठी तुझे घुंगरू विकू नकोस. श्वास घे."

लिफ्ट १९ व्या मजल्यावर उघडली.

रिया बाहेर पडली, तेव्हा तिच्या खांद्यावरचं ओझं कमी झालं होतं. तिने ठरवलं होतं, नोकरी लागली तरी वीकेंडला ती पुन्हा डान्स क्लास जॉईन करेल.

डॉक्टर बाहेर पडले. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं नाही. त्यांनी मनाशी ठरवलं, आज घरी गेल्यावर धूळ खात पडलेली बासरी शोधून काढायची.

सुरेश आपली टिफिन बॅग घेऊन आनंदाने गुणगुणत निघून गेला. त्याला माहीत होतं, आज संध्याकाळी त्याला पुन्हा 'पात्रात' जगायचं आहे.

अंजली तिथेच उभी राहिली. लिफ्टच्या आरशात तिने स्वतःचा चेहरा पाहिला. तोच चेहरा, पण आता त्यावरचा 'परफेक्ट' दिसण्याचा दबाव निघून गेला होता.

काही आठवड्यांनंतर...

त्या लिफ्टच्या प्रसंगाने अंजलीच्या आयुष्याचा 'फ्लोअर'च बदलला होता.

पहिल्या आठवड्यात, तिच्या डायरीत 'बोटोक्स अपॉइंटमेंट' होती. तिने ती खोडून काढली. त्याऐवजी तिने दादरच्या मार्केटमध्ये जाऊन कॅनव्हास आणि रंगांचे डबे विकत घेतले. गर्दीतल्या धक्काबुक्कीत तिला जिवंतपणा जाणवला.

दुसऱ्या आठवड्यात, तिच्या घरी एक हाय-प्रोफाईल डिनर पार्टी होती. विक्रमने तिला 'ती' एमराल्डची साडी नेसायला सांगितली होती. पण अंजली बाहेर आली ती एका साध्या, सुती साडीत. चेहऱ्यावर मेकअपचा थर नव्हता, फक्त एक आत्मविश्वास होता.

जेव्हा एका पाहुणीने म्हटलं, "अहो, आर्किटेक्चर वगैरे आता आमच्या वयात काय करायचं? मुलांकडे लक्ष द्यावं."

तेव्हा जुनी अंजली गप्प बसली असती. पण नवीन अंजली शांतपणे म्हणाली, "मुलांना वाढवणं हे काम आहे, पण स्वतःला मारून टाकणं हे कर्तव्य नाही. मी पुन्हा कॉलेज जॉईन करतेय. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून."

विक्रम थक्क होऊन बघत होता, पण अंजलीच्या डोळ्यात अशी चमक होती की तो काही बोलू शकला नाही.

एका महिन्यानंतर, अंजलीला एक पार्सल मिळालं. त्यात 'वपु काळ्यां'चं एक पुस्तक आणि एक चिठ्ठी होती.

"लिफ्टमधल्या ताईंसाठी... मला नोकरी मिळाली. पण मी कालच एका डान्स एकॅडमीत ऍडमिशन पण घेतली. मी आता धावत नाहीये, मी आता नाचतेय. थँक्यू. - रिया."

अंजली बाल्कनीत येऊन बसली. समोर अथांग समुद्र होता. तिने हातात चारकोल पेन्सिल घेतली आणि कोऱ्या कागदावर एक रेष ओढली. ती रेष वाकडी होती, पण ती तिची होती.

तिचा मुखवटा गेला होता. आता फक्त ती होती—अस्सल, शांत आणि प्रवाही.

कारण आयुष्याचा उत्तरार्ध आता सुरू झाला होता—इतरांच्या टाळ्यांसाठी नाही, तर स्वतःच्या समाधानासाठी!

Wednesday, January 28, 2026

Wonderful Stories and Articles — एक मनापासून सुरुवात

 

Wonderful Stories and Articles — एक मनापासून सुरुवात ✨

नमस्कार मित्रांनो,

Wonderful Stories and Articles या माझ्या ब्लॉगवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.
हा ब्लॉग म्हणजे शब्दांची, विचारांची आणि भावनांची एक छोटीशी पण प्रामाणिक दुनिया आहे.

📌 या ब्लॉगमागचा उद्देश

मराठी ही केवळ भाषा नाही, ती एक भावना आहे.
या ब्लॉगचा मुख्य उद्देश म्हणजे —

  • दर्जेदार मराठी कथा आणि लेख वाचकांपर्यंत पोहोचवणे

  • जीवनातील विविध पैलूंवर विचार करायला लावणारे लेखन सादर करणे

  • कल्पनाशक्ती, अनुभव, समाज, निसर्ग, मानसशास्त्र, संस्कृती, नाती, वास्तव आणि कल्पना —
    विविध विषयांवर आधारित लेखन एका ठिकाणी उपलब्ध करून देणे

  • नव्या पिढीला मराठी वाचनाची गोडी लावणे

येथील प्रत्येक कथा व लेख हा मनापासून लिहिलेला असेल — कोणत्याही एका चौकटीत न अडकता.

👥 हा ब्लॉग कोणासाठी आहे?

हा ब्लॉग खास —

  • कथा वाचायला आवडणाऱ्या प्रत्येकासाठी

  • मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांसाठी

  • विचार करायला, थांबायला आणि भावना समजून घ्यायला आवडणाऱ्या वाचकांसाठी

  • विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कलाकार, शेतकरी, नोकरदार, गृहिणी —
    सर्व वयोगटांतील मराठी वाचकांसाठी

तुम्ही नियमित वाचक असाल किंवा योगायोगाने इथे आलात असाल —
जर तुम्हाला शब्दांशी नातं आहे, तर हा ब्लॉग तुमचाच आहे.

📖 इथे काय वाचायला मिळेल?

  • लघुकथा आणि दीर्घ कथा

  • सामाजिक, वैचारिक आणि अनुभवाधारित लेख

  • कधी गंभीर, कधी हलकेफुलके, कधी अंतर्मुख करणारे लेखन

  • वास्तव आणि कल्पनेचा सुंदर संगम

प्रत्येक पोस्टचा एकच प्रयत्न असेल —
वाचकाच्या मनाला स्पर्श करणे.

🤝 तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे

हा ब्लॉग वाढावा, अधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तुमचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे.

  • कथा/लेख वाचून कॉमेंट करा

  • आवडलेली पोस्ट शेअर करा

  • ब्लॉग फॉलो/सबस्क्राइब करा

  • तुमचे विचार, मत, प्रतिक्रिया नक्की कळवा

तुमच्या एका प्रतिक्रियेमुळेही लेखकाला लिहितं राहण्याचं बळ मिळतं.


शब्दांमधून संवाद साधण्याचा हा प्रवास तुमच्यासोबत करायचा आहे.
चला तर मग, वाचनाच्या या सुंदर प्रवासाला एकत्र सुरुवात करूया…

– Wonderful Stories and Articles
✍️ लेखक

Monday, January 26, 2026

सह्याद्रीची शांतता

 

सह्याद्रीची शांतता

मीराने मायक्रोस्कोपचे फोकस ॲडजस्ट केले. लॅबमधील पांढऱ्याशुभ्र प्रकाशात रात्रीच्या वेळी एक निशब्द शांतता होती. वयाच्या ३२ व्या वर्षी, एका 'सिंगल मदर'ची जबाबदारी आणि फॉरेन्सिक सायन्समधील धकाधकीचे करिअर ती एका शांत आणि कणखर वृत्तीने सांभाळत होती. तिची शरीरयष्टी मध्यम होती, रंग गव्हाळ, आणि चेहऱ्यावर एक तकाकी होती - अशा स्त्रीची जी संकटांच्या आगीतून तावून सुलाखून निघाली आहे. तिचे डोळे मात्र थकलेले होते, त्यात खोलवर काहीतरी साठवलेले होते - जे सहसा रोज मृत्यू पाहणाऱ्या आणि जिवंत माणसांच्या वेदना जाणणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात दिसते.
ती फक्त एक शास्त्रज्ञ नव्हती. ती संवेदनशील होती. अतिशय संवेदनशील.
दरवाजा उघडला. इन्स्पेक्टर विक्रम सिंग आत आले. ते खूप थकलेले दिसत होते - असा थकवा जो थेट हाडांपर्यंत भिनला असावा.
"मीरा," त्यांचा आवाज जड झाला होता, "तो सापडला."
गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेला रोहन, पंधरा वर्षांचा मुलगा, पहाटे सिटी पार्कमधील एका बाकावर बसलेला सापडला. तो भलताच शांत होता. अंगावर एकही जखम नाही. झटापटीच्या खुणा नाहीत. कपडे स्वच्छ, केस विंचरलेले. पण त्याचे मन मात्र रिकाम्या पाटीसारखे झाले होते. गेल्या १४४ तासांत काय घडले, हे त्याला काहीच आठवत नव्हते.
"मला वाटतं तू त्याचे कपडे आणि बूट तपासावेस," विक्रमने पुराव्याची पिशवी टेबलावर ठेवत म्हटले. "फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काहीच हाती लागत नाहीये. त्याच्या स्वतःच्या DNA शिवाय दुसरं काहीच नाही. हे असं वाटतंय की जणू काही काळासाठी त्याचं अस्तित्वच थबकलं होतं."
मीराने पिशवी हातात घेतली. जसा तिने प्लॅस्टिकला स्पर्श केला, तिच्या हाताला विजेचा झटका बसावा तशी एक तीव्र जाणीव झाली - कड्यावरून वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासारखी एक थंडगार शिरशिरी. तिने पटकन हात मागे घेतला, तिचा श्वास रोखला गेला.
"हे माझ्याकडे राहू दे," ती हळूच म्हणाली.
त्या रात्री विज्ञानाने हार मानली. रोहनच्या बुटांवरील माती साधी शहरातील धूळ होती. शर्टावरचे परागकण स्थानिक पार्कमधलेच होते. गुन्ह्याचा कोणताही भौतिक पुरावा नव्हता.
दमून मीरा लॅबमधील सोफ्यावरच झोपी गेली. आणि तेव्हाच तिला तो स्वप्न-दृष्टांत झाला.
ती एका उंच, ओबडधोबड कड्याच्या टोकावर उभी होती, कानात वाऱ्याचे सुसाट आवाज घुमत होते. खाली खोल दरी होती - जिथे पडलात तर मृत्यू अटळ. तिला एक आकृती दिसली - एक उंच, धिप्पाड माणूस एका घाबरलेल्या मुलावर चाल करून जात होता. त्या माणसाची उर्जा एखाद्या काळ्याकुट्ट डांबरासारखी गुदमरवून टाकणारी होती. मीराला ती उर्जा ओळखीची वाटली. तिच्या घशाला कोरड पडली. तो माणूस खुनी इराद्याने पुढे सरसावला, एका अडथळ्याला कायमचे दूर करण्यासाठी. पण त्या मुलाने, मरणाच्या भीतीने ग्रासलेल्या त्या मुलाने, जिवाच्या आकांताने त्याला जोरात धक्का दिला. त्या माणसाचा तोल गेला. त्याचे महागडे चामड्याचे बूट निसरड्या शेवाळावरून घसरले. आणि डोळ्यात भीतीची लकेर घेऊन तो पाठीमागे खोल दरीत कोसळला.
मीरा दचकून जागी झाली, घामाने ती ओलीचिंब झाली होती. स्वप्नातील त्या माणसाचा वास अजूनही तिच्या नाकात रेंगाळत होता. महागडे अत्तर, शिळा तंबाखू आणि क्रूरता.
तो वास तिला चांगलाच माहित होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी, मीरा विक्रमसोबत चौकशीच्या खोलीत (interrogation room) बसली होती. रोहन त्यांच्या समोर होता, पाण्याच्या ग्लासाकडे एकटक बघत.
"तो काहीच बोलत नाहीये," विक्रम हळू आवाजात म्हणाला. "सावत्र वडिलांनी तो हरवल्याची तक्रार केली होती. पण आता... ते सावत्र वडीलच गायब आहेत. आईला वाटतंय ते 'बिझनेस ट्रिप'वर आहेत. पण त्यांचा फोन बंद आहे."
"त्या सावत्र वडिलांचं नाव काय?" मीराने विचारले, तिचा आवाज किंचित थरथरला.
"राजीव खन्ना."
ते नाव ऐकताच मीराला धक्का बसला. तिच्या गव्हाळ चेहऱ्यावरून रक्ताची लाली नाहीशी झाली.
"मीरा?" विक्रम पुढे झुकला. "तू ओळखतेस त्याला?"
तिने काचेच्या पार्टिशनकडे पाहिले, जिथे तिला स्वतःचेच प्रतिबिंब दिसत होते. "मी ओळखत होते त्याला," ती तुटक, भावहीन आवाजात म्हणाली. "काही वर्षांपूर्वी. माझा मुलगा होण्याआधी. तो... मला आवडायचा."
विक्रम तिच्याकडे बारकाईने बघत होता. "आणि?"
"तो चार्मिंग होता," मीराने बाहीचा एक धागा ओढत म्हटले. "पण फक्त दरवाजा बंद होईपर्यंत. तो अहंकारी होता. क्रूर होता. खास करून... शारीरिक संबंधांमध्ये. त्याला लोकांवर मालकी गाजवायला आवडायचं, विक्रम. तो लोकांना फक्त दुखवत नव्हता; तर त्यांचा आत्मा तोडायचा प्रयत्न करायचा. तो असा माणूस आहे ज्याचं अस्तित्वात नसणंच बरं."
तिने रोहनकडे पाहिले. आता तो पाण्याकडे बघत नव्हता. तो मीराकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात तिला तिच्या स्वप्नाचे प्रतिबिंब दिसले.
"ते स्वप्न," मीराने विक्रमजवळ झुकून कुजबुजल्यासारखे सांगितले, जेणेकरून रोहनला ऐकू जाणार नाही. "मला एक कडा दिसला. धुकं होतं. सावत्र वडिलांना हा मुलगा नको होता. कदाचित त्याला त्याच्या नवीन आयुष्यात अडचण नको होती, किंवा त्याला जबाबदारी घ्यायची नव्हती. तो त्याला संपवण्यासाठी तिथे घेऊन गेला होता. जेणेकरून तो अपघात वाटावा."
विक्रमचे डोळे बारीक झाले. "पण मुलगा इथे आहे. आणि राजीव गायब आहे."
"कारण मुलाने प्रतिकार केला," मीरा म्हणाली, आता सगळं चित्र तिला स्पष्ट झालं होतं. "रोहनचं अपहरण झालं नव्हतं. तो वाचला आहे. त्याने राजीवला धक्का दिला. तो खून नव्हता, विक्रम. ते गुरुत्वाकर्षण आणि न्याय होता."
विक्रम उभा राहिला आणि खिडकीपाशी गेला. त्याने त्या १५ वर्षांच्या मुलाकडे पाहिले - ज्याने एका राक्षसाला मरताना पाहिले होते आणि जगण्यासाठी तो आघात (trauma) मनातून पुसून टाकला होता.
जर विक्रमने तपास केला, तर त्याला सह्याद्रीच्या पायथ्याशी एक मृतदेह मिळेल. त्याला हेतू (motive) मिळेल. आणि एका लहान मुलाला 'सदोष मनुष्यवधा'साठी अटक करावी लागेल, ज्यामुळे उरलेसुरले आयुष्यही उद्ध्वस्त होईल.
विक्रमने मीराकडे पाहिले. तिच्या डोळ्यात त्याला मुलाबद्दल कमालीची संरक्षणाची भावना दिसली. तिला माहित होते राजीव काय होता. तिला माहित होते की त्याच्याशिवाय जग अधिक चांगले आहे.
विक्रम पुन्हा खाली बसला, फाईल उघडली आणि पेन हातात घेतले.
"मीरा," विक्रम स्थिर आवाजात म्हणाला. "फॉरेन्सिक रिपोर्टनुसार मुलाच्या बुटांवर सापडलेली माती कोणत्याच विशिष्ट जागेची नाही. त्यामुळे कोणताही 'क्राईम सीन' सिद्ध होत नाही. झटापटीचे कोणतेही पुरावे नाहीत."
त्याने थेट तिच्या डोळ्यात पाहिले.
"आणि प्रश्न राहिला मिस्टर खन्ना यांचा... अशा माणसांचे अनेक शत्रू असतात. ते अनेकदा गायब होतात. कर्जापासून पळ काढण्यासाठी किंवा जबाबदारी टाळण्यासाठी. ही एक 'कोल्ड केस' (न सुटणारे कोडे) म्हणून पडून राहील."
मीराने त्याची नजर झेलली. "आणि तो मुलगा?"
"मुलगा," विक्रमने फाईल बंद करत मोठा आवाज केला, "हरवला होता, आणि आता सापडला आहे. मानसिक आघातामुळे स्मृतीभ्रंश (memory loss) होतो. ही एक शोकांतिका आहे, पण आता तो सुरक्षित आहे. आणि हेच एकमेव सत्य महत्त्वाचे आहे."
मीरा रोहनकडे वळली. सहा दिवसांत पहिल्यांदाच मुलाच्या डोळ्यातील धुकं विरल्यासारखे वाटले. त्याने एक खोल श्वास घेतला, जणू काही एका गुप्त गोष्टीचे अदृश्य ओझे त्याच्या खांद्यावरून उतरले होते. त्याला जाणीव झाली की आता त्याची शिकार केली जाणार नाही.
त्याने मीराकडे पाहिले आणि हलकीशी, नजरेनेच होकारार्थी मान हलवली.
मीरा हसली, एक अस्सल, उबदार हास्य तिच्या डोळ्यांपर्यंत पोहोचले. राक्षस गेला होता. मुलगा सुरक्षित होता. आणि तो डोंगर त्यांचे रहस्य कायमचे जपून ठेवणार होता.

Sunday, January 25, 2026

COMMON Man

 २०१४ सालच्या मे महिन्यातील मुंबईचं ऊन म्हणजे जणू अंगाची लाहीलाही करणारा एक अक्राळविक्राळ राक्षस होता. कुर्ल्याच्या त्या डांबरी रस्त्यांवरून उन्हाच्या वाफा निघत होत्या. पण 'फिनिक्स मार्केट सिटी' मॉलच्या आतल्या वातानुकूलित यंत्रणेने त्या उष्णतेपासून एक तात्पुरता आणि नाजूक दिलासा दिला होता. गजानन, वय ५६, एका सरकारी कार्यालयातील कारकून. तीस वर्षे फायलींवर झुकून काम केल्यामुळे त्यांच्या पाठीला थोडा बाक आला होता. मॉलच्या त्या चकचकीत दालनातून ते एखाद्या संथ चालणाऱ्या सावलीसारखे जात होते. गजानन म्हणजे एक असा माणूस, ज्याचं अस्तित्व कोणाला जाणवतही नसे; चहाची सुट्टी आणि पेन्शनचे आकडे यातच त्यांचं आयुष्य मोजलं जात होतं.

मॉलच्या वरच्या मजल्यावरील रेलिंगला टेकून २८ वर्षांची अनन्या उभी होती. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या अनन्याला आपल्या आयुष्याचा प्रचंड कंटाळा आला होता. तिचं आयुष्य म्हणजे जणू कोड आणि कॅफिनचा एक नीरस साचा झाला होता. खालच्या मजल्यावर फिरणाऱ्या गर्दीकडे ती शून्य नजरेने बघत असतानाच तिची नजर एका दृश्यावर खिळली. एक श्रीमंत माणूस, महागडा सूट घातलेला, दारूच्या नशेत झुलत चालला होता. त्याच्या हातात एक महागडी सुटकेस होती, जी त्याने अगदी घट्ट पकडली होती. चालता चालता त्याचा पाय लटपटला आणि सुटकेसचं लॉक किंचित उघडलं. त्यातून दिसणाऱ्या ५०० आणि १००० च्या नोटांच्या थप्प्या बघून अनन्याचा काळजाचा ठोका चुकला.
तिथे फक्त अनन्याचीच नजर नव्हती. समीर नावाचा एक माणूस, ज्याचे डोळे एखाद्या शिकारी श्वापदासारखे होते, तोही त्या सुटकेसचा मागोवा घेत होता. पण समीरची भूक फक्त पैशापुरती मर्यादित नव्हती. त्याची नजर वारंवार त्या पैशांवरून हटून तिथेच उभ्या असलेल्या एका ३६ वर्षीय महिलेवर जात होती. त्या महिलेने मोरपंखी रंगाची रेशमी साडी नेसली होती आणि ती त्या मद्यधुंद माणसाला सावरण्यासाठी पुढे सरसावली होती. ती महिला दिसायला अतिशय आकर्षक होती, तो शेठ व ती स्त्री मॉल मधील रेस्टॉरंट मधून रूम वर जाण्याच्या तयारीत वाटत होते. तिच्या ओसंडत्या शरीराकडे समीर ची वासनाधंद नजर, पैसे आणि स्त्री दोघांवर झडप मारणाऱ्या या हिंस्त्र माणसाची नजर आपल्यावर आहे याची तिला पुसटशी कल्पनाही नव्हती.
दुपारची ती भयानक उष्णता जणू आता बेसमेंट पार्किंगच्या काळोखात शिरली होती. तो मद्यधुंद माणूस व ती स्त्री अडखडत अडखडत आपल्या गाडीकडे जात होते, समीर ने घाईघाईने समोरून जात त्या माणसाला गाडीत बसत असताना धडक मारली व बॅग खाली पडली, त्तो शेठजी आत ड्रायव्हर सीटवर, बॅग पडल्याचे लक्षात आल्यावर ती स्त्री गाडी ओलांडून बॅग उचलण्यासाठी आली, गाडी सुरू झाली व ती शेठ फरकान गाडी चालवत निघून गेला, ती स्त्री ओरडली, पण शेठला कोठे ऐकू येते बंद कचातून. दुसऱ्याचा क्षणात तिथे शांतता पसरली, सामोरे बॅग पडलेली, जवळ ती मादक स्त्री आपला पदर सावरते आहे आणि समीर सामोरे उभा, पैसे सोबत स्त्री दोन्ही आपले, त्याचे छद्मी हाय चेहऱ्यावर पसरले, रेशमी साडी नेसलेली ती महिला पार्किंगच्या एका खांबाजवळ समीरच्या तावडीत सापडली. समीरचे इरादे अत्यंत घाणेरडे होते, त्याच्या आवाजात एक प्रकारची धमकी आणि वासना होती. आपल्या आयुष्यातील तोचतोचपणा घालवण्यासाठी अनन्या त्या सुटकेसच्या मागे तिथे पोहोचली खरी, पण समोरचं दृश्य बघून ती हादरली.
त्याच वेळी गजानन आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बस डेपोला जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून पार्किंगमधून जात होते. अनन्याने बघितलं की समीर त्या महिलेवर जबरदस्ती करू पाहत आहे. भीती आणि घाईत तिने बाजूच्या भिंतीवर अडकवलेलं लाल अग्निशमन यंत्र काढलं. त्या झटापटीत, आरडाओरड आणि सावल्यांच्या खेळात, अनन्याने ते जड यंत्र पूर्ण ताकदीनिशी फिरवलं. तिचा वार समीरवर होणार होता, समीर मागे सरकला, ती महिला मध्ये आली. एक भयानक आवाज झाला आणि ते धातूचं यंत्र त्या महिलेच्या कानशिलावर बसलं. ती ३६ वर्षांची महिला क्षणात कोसळली आणि तिथेच तिचा जीव गेला. अनवधानाने एक खून झाला होता.
त्या शांततेत अचानक एका शिट्टीचा आवाज झाला. इन्स्पेक्टर सावंत एका कारच्या मागून बाहेर आले. त्यांचा गणवेश घामाने थबथबलेला होता, पण त्यांच्या डोळ्यांत न्यायाची कोणतीही भावना नव्हती. ते प्रत्यक्षात त्या सुटकेसच्या मागेच होते, पण आता त्यांना त्यापेक्षा मोठी संधी दिसत होती. त्यांनी त्या महिलेचा मृतदेह, समीर चा अवतार, समोर पडलेली बॅग, थरथरणारी अनन्या आणि स्तब्ध झालेले गजानन यांच्याकडे पाहिलं.
"अनवधानाने झालेला खून," सावंत अगदी थंडपणे म्हणाले. "तुझ्यासारख्या मुलीला आर्थर रोड जेलमध्ये आयुष्य सडावं लागेल. आणि समीर, तुझं रेकॉर्ड मला माहित आहे. हा कार्यक्रम फसत चालल्यासारखा वाटतोय." ते सावकाश हसले. "किंवा आपण या सुटकेसबद्दल बोलू शकतो, मी ही बॉडी गायब करायला मदत करतो, आणि आपण सगळे श्रीमंत होऊ. या मुंबईच्या उन्हात न्याय खूप महाग असतो."
सावंत आपल्या अटी सांगू लागले, त्यांच्या आवाजात एक प्रकारचा माज होता. त्यांनी गजाननकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं; त्यांना वाटलं हा 'स्लो' म्हातारा भीतीमुळे गप्प बसला आहे. पण गजानन, ज्यांनी सरकारी कार्यालयांतल्या भ्रष्टाचाराच्या गल्ल्यांमध्ये तीस वर्षे घालवली होती, त्यांना एक गोष्ट पक्की माहित होती—जो माणूस सर्वात जास्त ओरडतो, तोच सर्वात जास्त कमकुवत असतो.
सावंत जेव्हा अनन्या आणि समीरवर दबाव टाकत होते, तेव्हा गजानन अतिशय शांतपणे आणि सराईतपणे हालचाल करत होते. ते पळाले नाहीत; त्यांनी खिशातून मोबाईल काढून बघितला आणि पुन्हा ठेवला, ते शांतपणे विश्वासाने चालत सावंतांच्या पोलीस गाडीकडे सरकले. वर्षानुवर्षे फायलींची हाताळणी करणाऱ्या त्या स्थिर हातांनी गाडीच्या उघड्या खिडकीतून गुपचूप चाव्या काढल्या आणि पुन्हा तेथे येऊन उभे राहिले, सर्व जण त्यांच्या कडे स्तब्ध होऊन बघत होते, आता पुढे काय होणार?
"फाइल अजून क्लोज झालेली नाही, इन्स्पेक्टर," गजानन यांचा आवाज त्या तणावात दुमदुमला. त्यांच्या आवाजात एक विलक्षण आत्मविश्वास होता. मोबाईल चा रेकॉर्डर बंद करीत ते म्हणाले. सावंत यांनी केलेल्या खंडणीच्या मागणीचे सर्व पुरावे आता गजाननच्या हातात होते. परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. मुंबईच्या त्या उष्ण पार्किंगमध्ये, ती कंटाळलेली मुलगी, तो शिकारी माणूस आणि तो भ्रष्ट पोलीस... हे तिघेही आता एका अशा माणसाच्या ताब्यात होते ज्याला त्यांनी 'common man’' समजून दुर्लक्षित केलं होतं. त्या सामान्य माणसाने अखेर जगाची वाट पाहणं सोडून दिलं होतं; त्याने स्वतः सूत्रं हातात घेतली होती.

इन्स्पेक्टर सावंत यांचा चेहरा रागाने लाल झाला. एका साध्या कारकुनाने आपल्याला अशा प्रकारे अडकवावे, हे त्यांच्या पचनी पडत नव्हते. त्यांनी आपला हात कंबरेला लावलेल्या रिव्हॉल्व्हरकडे नेला, पण गजानन विचलित झाले नाहीत.
"सावंत साहेब, हात थोडा लांबच ठेवा," गजानन शांतपणे म्हणाले, जणू ते ऑफिसमध्ये एखादी जुनी फाईल चेक करत आहेत. "मी या रेकॉर्डरवरचं बटण दाबलं की हे सगळं रेकॉर्डिंग थेट माझ्या एका ओळखीच्या पत्रकाराला आणि तुमच्या वरिष्ठांना जाईल. मी ३० वर्षं सरकारी खात्यात घालवली आहेत, कोणता माणूस किती पाणी पाजतो हे मला चांगलंच समजतं." रोज मुंबईत फिरतो, हा माझा छंद आहे, दिवसभर मोबाईलवर रेकॉर्ड करतो आणि मी कंटाळवाणा एकटे पणा घालवण्यासाठी रात्री माझा दिवस रिवाइंड करून पुन्हा जगतो. उगाच रात्री मोबाईलवर लोकांचे खोटे फसवे काल्पनिक जगणे बघण्यापेक्षा आपणच जगलेलो पण जगताना दुर्लक्षित झालेले जग बघावे. मजा येते आणि असलें काही ‘चमत्कार - साक्षात्कार’ ही टिपता येतात, मित्रांना मदत होते, सावंतांचा हात थांबला. अनन्या आणि समीर दोघेही श्वास रोखून हा खेळ बघत होते. आतापर्यंत घाबरलेली अनन्या गजानन यांच्या या नव्या रूपाकडे बघून थक्क झाली होती.
"तुम्हाला काय हवंय?" सावंत दात ओठ खात ओरडले. "पैसे हवेत? अर्धा वाटा देतो, पण तो मोबाईल माझ्या हवाली करा."
गजानन थोडे हसले, पण त्या हसण्यात आनंद नव्हता, तर एक प्रकारचा विखारीपणा होता. "मला पैसे नकोत साहेब. मला फक्त आता ही शांतता हवीय. तुम्ही आता गपचूप या महिलेचा मृतदेह आणि या समीरला तुमच्या गाडीत टाका आणि इथून निघून जा. या मुलीचा (अनन्याचा) यात काहीही दोष नाही, तिने फक्त त्या स्त्रीचा व स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला." गजानन ने चाबी सावंत कडे भिरकावली, जणू तू निघ आता असा इशाराच दिला.
सावंतांनी क्षणभर विचार केला. त्यांना माहित होतं की गजानन आता मागे हटणार नाहीत. त्यांनी समीरला खुणावलं. समीर, जो आतापर्यंत स्वतःला मोठा शिकारी समजत होता, तो गजाननच्या त्या शांत नजरेसमोर पाळीव कुत्र्यासारखा वागू लागला. त्या दोघांनी मिळून तो मृतदेह गाडीच्या डिकीत टाकला व बॅग उचलली.
जाण्यापूर्वी सावंत गजाननच्या जवळ आले आणि हळू आवाजात म्हणाले, "म्हातारा माणूस आहेस म्हणून सोडतोय, पुन्हा समोर येऊ नकोस."
गजानन यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. त्यांनी फक्त मोबाईल चा रेकॉर्डर पुन्हा सुरू केला, शर्टच्या खिशात टाकला आणि अनन्याकडे वळले. अनन्या अजूनही थरथरत होती.
"बाळा, घरी जा," गजानन तिला म्हणाले. "आज जे झालं ते विसरून जा. तुझ्या कॉम्प्युटरच्या जगात हे सगळं नसतं, तिथेच परत जा. आणि हो, यापुढे कधी आयुष्याचा कंटाळा आला, तर लक्षात ठेव की एक 'साधा' क्षण सुद्धा आयुष्य कसं बदलू शकतो." असे कितीतरी क्षण तुझ्या अवतीभावी आहेत ते बघ, जाण आणि मस्त जग.
अनन्या काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त मान डोलावली आणि ती धावतच मॉलच्या बाहेर पडली.
पार्किंगमध्ये आता फक्त गजानन उरले होते. त्यांनी खिशातून आपला बसचा पास काढला. बाहेर अजूनही मे महिन्याचं ऊन रणरणत होतं. पण आज ३० वर्षांत पहिल्यांदाच गजानन यांना त्या उन्हाची झळ लागत नव्हती. त्यांनी संथ पावलांनी बस स्टॉपच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्यांच्या चेहऱ्यावर आजही तोच 'सामान्य' भाव होता, पण खिशात असलेला तो मोबाईल रेकॉर्डर एका मोठ्या वादळाची शांतता जपून होता.
त्या दिवशी संध्याकाळी मुंबईच्या गर्दीत एक साधा सरकारी कारकून हरवून गेला, पण एका गुन्हेगाराची झोप उडवून.

Tuesday, January 13, 2026

लापता

 

लापता

तो दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता.
सकाळची उन्हं, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपरीवरचा उकळता किटलीचा आवाज, आणि गावाच्या मध्यभागी असलेला तो जुना वड—ज्याच्या सावलीखाली पिढ्यानपिढ्या चर्चा होत आल्या होत्या. फरक इतकाच होता, की त्या दिवशी चर्चेचा विषय माणसं नव्हती, तर हरवलेली मूल्यं होती.
खेडं समृद्ध होतं.
किमान कागदावर तरी.
रस्ते होते, पाट्या होत्या, योजनांची नावं होती, उद्घाटनांचे फोटो होते. पण तरीही त्या दिवशी, वर्तमानपत्राच्या चौकटीत छापलेली बातमी गावाला अस्वस्थ करून गेली—
“एक तरुण बेपत्ता. नाव – विकास.”
आणि त्याच बातमीच्या खालच्या ओळीत, जणू नकळत—
“संस्कार आणि संस्कृती या दोन तरुणीही काही काळापासून दिसेनाशा.”
कोणीही पहिल्यांदा वाचताना लक्ष दिलं नाही.
विकास हरवणं हे आता नवीन राहिलेलं नव्हतं. तो अधूनमधून हरवत असे, पुन्हा एखाद्या घोषणेत, एखाद्या जाहिरातीत, एखाद्या भाषणात सापडत असे. पण यावेळी वेगळं होतं. कारण यावेळी संस्कार आणि संस्कृतीही सोबत गायब होत्या.
संस्कार आणि संस्कृती—
सख्ख्या बहिणी.
त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना शिकवलं होतं, “आपण गोंधळातही आपली ओळख विसरायची नाही.”
पण काळ असा होता, की ओळख विसरण्याला प्रगती म्हणू लागले होते.
गावातले म्हातारे सांगत.
“लहानपणी तिघंही एकत्र खेळायचे. विकास थोडासा मागे, पण कायम उत्साही. संस्कार शांत, संस्कृती जरा चंचल.”
कोणी त्यांचं नातं विचारलं, तर उत्तर धूसर मिळायचं.
नातं नव्हतं, एक सहवास होता.
एकमेकांशिवाय अपूर्ण असलेलं अस्तित्व.
पण जसजसा काळ पुढे गेला, तसतशी दृश्यं बदलू लागली.
विकास मोठा होत गेला.
पण त्याचं वाढणं विचित्र होतं. उंची वाढत होती, पण मुळं खोल जात नव्हती. त्याला अनेकांनी दत्तक घ्यायचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या पक्षांनी, वेगवेगळ्या धोरणांनी. कोणी त्याला ‘जलद’ म्हणालं, कोणी ‘सर्वसमावेशक’, कोणी ‘टिकाऊ’. पण कुणीही त्याला विचारलं नाही—
“तुला नक्की काय व्हायचं आहे?”
संस्कार आणि संस्कृती मात्र तिथेच होत्या.
थोड्या गोंधळलेल्या, थोड्या बाजूला सारलेल्या, पण अजूनही अस्तित्वात.
आमचे वार्ताहर, श्री. चिकित्सक, त्या दिवशी गावात आले.
त्यांचा चेहरा नेहमीसारखा शांत, पण डोळ्यांत प्रश्नांची गर्दी.
ते प्रत्येकाकडे गेले.
शेतकऱ्याकडे—
तो म्हणाला, “विकास? हो होता तो. पण तो कधी माझ्या शेतात टिकला नाही. दर वेळी नवं काहीतरी सांगून निघून जायचा.”
शिक्षकाकडे—
“संस्कार आणि संस्कृती? अभ्यासू होत्या. पण अभ्यासक्रम बदलत गेला, तसं त्यांचं महत्त्व कमी झालं.”
तरुणांकडे—
“आम्हाला वेग हवा होता. विचारायला वेळ नव्हता.”
आणि शेवटी, त्या वडाखाली बसलेल्या म्हाताऱ्याकडे—
तो बराच वेळ शांत होता. मग हळूच म्हणाला,
“एक गोष्ट सांगतो. जेव्हा कधी संस्कार आणि संस्कृती दिसायच्या, तेव्हा त्यांच्या मागे कुठे तरी विकास असायचा. आणि थोड्याच वेळात त्या दोघी गायब व्हायच्या.”
ही गोष्ट सगळ्यांना अस्वस्थ करून गेली.
जणू विकास, त्यांचा पाठलाग करत होता.
किंवा कदाचित, तो त्यांच्या आधारावरच उभा राहण्याचा प्रयत्न करत होता—आणि त्यातच त्यांना संपवत होता.
मिडियाला विषय मिळाला.
तासन्‌तास चर्चा झाल्या.
“नातं काय?”
“जबाबदार कोण?”
“षड्यंत्र आहे का?”
पण कुणीही हे विचारलं नाही—
आपण शेवटचं संस्कार आणि संस्कृती कधी पाहिलं?
आणि आपण तेव्हा काय केलं?
राज्यकर्ते निवेदने देत राहिले.
“चौकशी सुरू आहे.”
“लवकरच सत्य बाहेर येईल.”
“विकास आमचा प्राधान्यक्रम आहे.”
पण विकास सापडला नाही.
संस्कार आणि संस्कृतीही नाहीत.
कदाचित ते तिघे कुठेच गेले नाहीत.
कदाचित ते इथेच आहेत—
फक्त आपल्याला दिसेनासे झालेत.
कारण काही हरवत नाही,
ते फक्त दुर्लक्षित होतं.
आणि शेवटी, वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात छोटीशी जाहिरात छापली गेली—
“या तिघांबद्दल काही माहिती असल्यास, कृपया मतदार बंधुभगिनींना कळवावे.”
मी ती जाहिरात वाचली.
आणि मनात एकच विचार आला—
माहिती नाही.
जबाबदारी आहे.
पण ती स्वीकारायला
आपण अजून तयार नाही.

Sunday, January 11, 2026

माणूस ओळखण्याचं सूक्ष्म शास्त्र

 

माणूस ओळखण्याचं सूक्ष्म शास्त्र

माणूस ओळखणं हे साध्या डोळ्यांचं काम नाही हो, ते तर एक जबरदस्त 'सूक्ष्म निरीक्षणाचं' शास्त्र आहे. खोटं कशाला सांगू, आज आपण दररोज अशा असंख्य नातेसंबंधांच्या गोतावळ्यात जगतो, जे वरवर पाहता लोखंडासारखे मजबूत वाटतात; पण प्रत्यक्षात ते काचेसारखे ठिसूळ असतात. विश्वासाची गोष्ट तर सोडाच, तो आता बाजारात मिळणारी दुर्मिळ वस्तू झालीय. आपण आपली मौल्यवान भावनिक ऊर्जा आणि वेळ अशा लोकांमध्ये गुंतवत असतो, ज्यांचे खरे हेतू त्यांच्या सूक्ष्म हालचालींशिवाय कधीच स्पष्ट होत नाहीत. हे संकेत समजून घेणं ही केवळ नातेसंबंध टिकवण्याची कसरत नाही, तर स्वतःच्या मनाची आणि भावनिक जागेची अखंडता जपण्यासाठी केलेली एक अनिवार्य धडपड आहे.
अहो, गंमत सांगतो, आपलं शरीर म्हणजे एक अत्याधुनिक 'भावनिक रडार' आहे. आपलं डोकं किंवा तर्कनिष्ठ मन काय चाललंय हे समजून घेण्यापूर्वीच, या शरीराला त्या विषारी लहरींची चाहूल लागते. एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीत तुम्हाला अचानक अकारण थकवा, अस्वस्थता किंवा अनामिक ताण जाणवला, तर तो योगायोग नसतो. ती तुमची नैसर्गिक 'मानसिक संरक्षण यंत्रणा' असते, जी धोक्याचा इशारा देत असते. विचार करा, एखादी व्यक्ती खोलीत शिरताच तुमचं पोट खळबळतं, श्वास उथळ होतो; जणू काही समोर एखादा शिकारी हसून पुढच्या हल्ल्याची योजना आखतोय आणि तुमचं शरीर सावध होतंय. पण मग आपलं हे तथाकथित 'सुसंस्कृत मन' मधे येतं आणि म्हणतं, "अरे, एवढं काय नाटक करतोयस? त्यांनी तर काहीच चुकीचं केलं नाही." खरं तर, समोरची व्यक्ती इतकी सूक्ष्म विषारी ऊर्जा सोडत असते की फक्त तुमचं सुप्त मनच ती पकडू शकतं. हे एखाद्या अदृश्य किरणोत्सर्गासारखं आहे—दिसत नाही, पण त्याचे परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात.
प्रसिद्ध मनोवैज्ञानिक कार्ल जुंगने एक फार मोठी गोष्ट सांगून ठेवलीय. आपली मानसिकता थरांमध्ये काम करते. वरचा थर सभ्य, तार्किक आणि सामाजिक शिष्टाचाराने वेढलेला असतो; पण आतला एक प्राचीन थर असा आहे, ज्याला समाजाच्या नियमांची पर्वा नसते. तो फक्त तुमच्या सुरक्षिततेची काळजी करतो. दुर्दैवाने, समाजाने आपल्याला या धोक्याच्या घंटांकडे दुर्लक्ष करण्यासाठी प्रशिक्षित केलंय. "लोकांना संधी द्या, समजूतदार राहा, वरवरच्या रूपावरून न्याय करू नका," हे ऐकून आपण आपली स्वतःची संरक्षण यंत्रणाच बंद करून टाकली आहे. विचार करा, स्वतःचा सभ्यपणाचा देखावा राखण्यासाठी आपण किती वेळा आपल्या अंतःप्रेरणेशी प्रतारणा करतो? या मूक विश्वासघाताची किंमत किती मोठी असेल?
मत्सर नावाचं हे विष बघा, ते समोरच्याला हळूहळू मारतं. सर्वात घातक लोक ते असतात, ज्यांनी हे विष 'स्लो पोइसनिग' डोसमध्ये देण्याची कला आत्मसात केली असते. ते तुमच्यावर थेट वार करत नाहीत. त्याऐवजी, ते अशा शब्दांचा वापर करतात जे वरवर समर्थनासारखे वाटतात, पण तुमच्या आत्मविश्वासावर ॲसिडसारखं काम करतात. तुम्ही आयुष्यात काहीतरी महत्त्वाचं मिळवल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेचं नीट निरीक्षण करा. "वा, घर घेतलंस? छानच आहे, पण हा हप्ता आणि देखभालीचा खर्च तुला झेपेल ना?" किंवा "बढती मिळाली? अभिनंदन! पण आता जो ताण वाढणार आहे, तो तू पेलू शकशील का?" हे खरं समर्थन नसतं; हे विषाने माखलेलं समर्थन असतं. प्रत्येक अभिनंदनासोबत एक शंकेची सावली असतेच.
जुंग म्हणतो तसं, मत्सरी व्यक्तीची सुप्त सावली इतरांच्या यशाने कधीच सुखावू शकत नाही. त्यांचं मन आतल्या आत कुजबुजत असतं, "त्यालाच का? मला का नाही?" त्यांचं यश त्यांच्यासाठी एक क्रूर आरसा असतं, ज्यात त्यांना स्वतःच्या मर्यादा दिसतात. म्हणून ते तुम्हाला सूक्ष्मपणे खाली ओढण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून त्यांना स्वतःला पुन्हा श्रेष्ठ आणि सोयीचं वाटेल. हे लोक तुमच्या जवळचे हितचिंतक म्हणून वावरतात आणि तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल वारंवार सावध करून तुमच्या मनात असुरक्षिततेचं बी पेरतात.
आणि हे 'मॅनिपुलेटर्स'! हे तर मानसिक हिंसेचे कलाकार असतात. ते प्रेमाचा आणि काळजीचा मुखवटा घालून तुम्हाला आलिंगन देऊन तुमचा गळा घोटतात. संरक्षण देण्याच्या नावाखाली ते तुम्हाला कैद करतात. "मला फक्त तुझी काळजी वाटतेय" किंवा "तुला दुखावलेलं मला पाहायचं नाहीये," हे त्यांचं ब्रीदवाक्य असतं. पण खरी काळजी आणि नियंत्रणाचा मुखवटा यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. खरी काळजी माणसाला पंख देते, त्याला उडायला शिकवते; पण हे विषारी नियंत्रण माणसाला असुरक्षित करून दुसऱ्यावर अवलंबून ठेवतं. अशा व्यक्तीशी बोलल्यानंतर जर तुम्हाला अधिक उत्साह वाटण्याऐवजी स्वतःला छोटं आणि हतबल वाटत असेल, तर समजून जा की तिथे नियंत्रण आहे, प्रेम नाही.
काही लोक तर पडद्यामागून तुमच्या प्रतिष्ठेचा लिलाव मांडतात. ते थेट आरोप करत नाहीत, तर संभाषणातून शंकेची बी पेरतात. "तो थोडा विचित्र वागतोय असं वाटतंय ना?" किंवा "ती गोष्टी खूप फुगवून सांगते," अशा वाक्यांनी ते तुमची प्रतिमा हजारो लहान जखमांनी पोखरून टाकतात. यालाच जुंग 'सुप्त सावलीचं प्रक्षेपण' म्हणतो. ते स्वतःचे नकारात्मक गुण तुमच्यावर लादतात. या मानसिक युद्धापासून स्वतःचा बचाव करणं अशक्य असतं, कारण तुम्ही जेव्हा त्यांना जाब विचारता, तेव्हा ते स्वतःलाच 'बळी' म्हणून सादर करतात.
मानसिक हिंसेचा आणखी एक प्रकार म्हणजे सततचा आणि कठोर न्यायनिवाडा. काही माणसं न्यायाचं असं गुदमरवून टाकणारं क्षेत्र निर्माण करतात की, त्यांच्या उपस्थितीत तुमची नैसर्गिक वागणूकच हरवून बसते. जणू काही एखादा अदृश्य सेन्सर तुमच्या प्रत्येक शब्दाची नोंद करतोय असं तुम्हाला वाटतं. त्यांचे चेहऱ्याचे हावभाव तटस्थ असतात, पण त्यांचं शांत राहणं कोणत्याही ओरडण्यापेक्षा जास्त भीतीदायक असतं. अशा लोकांच्या मनात स्वतःबद्दल एक अत्यंत कठोर टीकाकार बसलेला असतो आणि तीच विनाशकारी ऊर्जा ते जगावर सोडतात. तुम्ही एका अशा मानसिक जेलरचे कैदी बनता, ज्याला तुम्ही कधीच खुश करू शकत नाही.
शेवटी, माणसाचं खरं स्वरूप कळण्याची एकच खात्रीशीर कसोटी आहे—ती म्हणजे तुमचा कठीण काळ. जेव्हा सगळं ठीक असतं, तेव्हा कुणीही मित्र होऊ शकतं; पण जेव्हा तुम्ही हतबल असता, तेव्हाच सामाजिक मुखवटे गळून पडतात. काही लोक तर 'भावनिक गिधाडां'सारखे असतात. तुम्ही संकटात असता तेव्हाच ते जवळ येतात; मदत करायला नाही, तर तुमच्या दुःखावर जगायला. तुमच्या पडझडीत त्यांना एक छुपे समाधान मिळत असतं.
मला समजलं होतं तसं तुम्हालाही समजलंय का, की हा कठीण काळ ही एक देणगी आहे? तो सत्याचा शोध घेणाऱ्या यंत्रासारखा असतो, जो खऱ्या माणसांना आणि भावनिक शोषकांना वेगळं करतो. आता तुम्ही या ज्ञानाचा वापर कसा करणार? स्वतःच्या अंतःप्रेरणेशी पुन्हा प्रतारणा करणार की या सत्याचा स्वीकार करण्याचं धैर्य दाखवणार? माणूस ओळखणं हे शेवटी एखाद्या पेंटिंगसारखं आहे—लांबून रंग दिसतात, पण जवळ गेल्यावरच ब्रशचे ओरखडे समजतात. स्वतःशी प्रामाणिक राहणं, हाच खऱ्या भावनिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे.

Saturday, January 3, 2026

लागण

 

लागण

लागण
मी खिडकीत उभा होतो, कारण मला बाहेर पाहायचं होतं म्हणून नाही, तर अंतर्मन आधीच सावध झालं होतं. जळगावची ती उन्हाळ्यातील संध्याकाळ नेहमीसारखीच असायला हवी होती. रस्त्यांवर पसरलेली उष्ण हवा, धुळीचा मंद वास, पिवळसर स्ट्रीटलाईट्स, दूर कुठेतरी स्कूटरचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं. सगळं ओळखीचं. पण तरीही काहीतरी चुकत होतं.
खिडकीतून खाली पाहिलं आणि मला ते दिसलं.
लोक,
खूप लोक.
ते मरगळल्या सारखे, पण ठरावीक पद्धतीनं चालत होते. वर्तुळात. अंडाकृती आकारात. कुठे जायचंय हे माहीत नसल्यासारखे, पण चालणं थांबवायचं नाही असा हट्ट धरल्यासारखे. कुणी बोलत नव्हतं. कुणी थांबत नव्हतं.
आणि मग मला ते मूल दिसलं.
रस्त्याच्या मधोमध पडलेलं. अगदी लहान. न हलणारं. झोपल्यासारखं. पण झोप नव्हती ती. लोक त्यावरून चालत होते. कुणी थोडं वाकून पाहिलंही नाही. कुणी थांबलं नाही.
त्या क्षणी मला कळलं.
ते लोक आजारी नव्हते.
ते घाबरलेले हि नव्हते.
ती माणसं राहिलेली नव्हती.
ती संक्रमित झालेली होती.
झोम्बी.
चित्रपटातले ओरडणारे राक्षस नाहीत. शांत, चालणारे, दिसायला माणसांसारखेच. पण आतून रिकामे.
माझ्या मागे, घरात माझे आईवडील उभे होते. तेही बघत होते. पण त्यांना काहीच कळत नव्हतं. ते म्हणत होते, ‘गरीब लोक आहेत’, ‘काहीतरी आंदोलन असावं, ’मोर्चा असावा, ‘आपण विचारूया’.
माझ्या अंगावर काटा आला.
‘त्यांना हात लावू नका,’ मी म्हणालो. ती माणसं राहिलेली नाहीत.’
ते हसले. दया वाटली त्यांना.
मग एकाने वर पाहिलं.
माझ्याकडे.
मग दुसऱ्याने.
मग सगळ्यांनी.
दारावर टकटक झाली.
हळू.
सभ्य.
वडिलांनी दार उघडलं.
ते आत आले.
त्या क्षणी माझ्या आत काहीतरी चमकले. मी हातात मिळेल ते उचलून मारायला सुरुवात केली. लाकडी काठी, लोखंडी सळई, जे मिळेल ते. ते रडत नव्हते. ओरडत नव्हते. फक्त पुढे येत होते.
वेळ थांबली होती.
माझे हात थकले.
माझा श्वास तुटत होता.
पण मी थांबलो नाही.
मागच्या दारातून ते पुन्हा आले.
मागे आग लागली.
जळत असतानाही ते चालत होते.
मी त्यांना ढकलत राहिलो.
आणि मग आकाशातून चमत्कारिक वस्तू पडली.
ते थांबले.
कोसळले, निपचित झाले.
शांतता.
मी जमिनीवर बसलो.
आणि जागा झालो.
घामेजलेला.
दमलेला.
"ते फक्त एक स्वप्न होतं... पण त्या एका स्वप्नाने माझ्यातलं सगळं काही बदलून टाकलं.
मला उमजलं की, खरी लागण कोणात्या विषाणूमुळे किंवा दातांनी चावा घेतल्यामुळे लागत नाही; ती लागण होते आपल्या 'दुर्लक्ष' करण्यामुळे. जेव्हा आपण समाज म्हणून चुकीच्या गोष्टींकडे सोयीस्करपणे डोळेझाक करतो, तेव्हा हा रोग पसरतो, पाप पुण्य व पुण्य पाप वाटायला लागते.
घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात, घर म्हणजे एक 'मर्यादा' असते; आणि प्रत्येकालाच ती सीमा मान्य नसते, ती लक्ख डोळे उघडे ठेऊन ओलांडावी लागेल, वास्तवात कोणता चमत्कार होणार नसतो.
मी आता पूर्णपणे जागा झालोय. झोम्बींच्या भीतीने नाही, तर माझ्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून. मी पुन्हा इतरांसारखा 'जिवंत प्रेत' होऊ नये, इतकीच धडपड आहे."

परिचीत

२०२२ चा मे महिना. मुंबईत उकाड्याने कहर केला होता. मरिन लाईन्सच्या अरबी समुद्रावरून येणारे वारेही जणू आज रस्ता विसरले होते. समीर, वांद्रे स्ट...