२०२२ चा मे महिना. मुंबईत उकाड्याने कहर केला होता. मरिन लाईन्सच्या अरबी समुद्रावरून येणारे वारेही जणू आज रस्ता विसरले होते. समीर, वांद्रे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभा होता. अंगातल्या पांढऱ्या शर्टला घामाचे चट्टे पडले होते आणि हातातली लॅपटॉपची बॅग आज त्याला नेहमीपेक्षा जास्त जड वाटत होती. समीर, वय २७, एका जाहिरात कंपनीत 'क्रिएटिव्ह कॉपीरायटर' म्हणून काम करायचा. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यातली ती 'क्रिएटीव्हीटी' जणू कुठेतरी हरवली होती. तो स्वतःला एक 'चालती-बोलती फाईल' समजू लागला होता.
लोकल आली. गर्दीचा तोच ओळखीचा लोंढा. समीरने कसाबसा आत प्रवेश मिळवला आणि एका खांबाचा आधार घेत लटकला. त्याच्या बाजूलाच अविनाश नावाचा त्याचा सहकारी उभा होता, जो सतत फोनवर कोणाशी तरी क्लायंटच्या 'डेडलाईन्स'बद्दल वाद घालत होता.
"समीर, ऐकतोयस का? जर आज आपण हे प्रेझेंटेशन सबमिट नाही केलं, तर बॉस आपल्याला जिवंत सोडणार नाही!" अविनाश ओरडत होता.
समीरने फक्त मान हलवली. त्याचं लक्ष अविनाशच्या बोलण्यापेक्षा बाहेरून वेगाने मागे जाणाऱ्या इमारतींकडे होतं. तो विचार करत होता— हेच का आयुष्य? सकाळी जाग आल्यापासून झोपे पर्यंत फक्त ऑफिस, assignment, project, presentation, दररोज सकाळी वांद्रे ते चर्चगेट, रात्री पुन्हा तोच प्रवास. शेकडो चेहरे भेटतात, पण कोणाशीच ‘संवाद’ नाही.
लोकल ग्रँट रोड स्टेशन सोडून पुढे निघाली. अचानक काही लोक उतरले आणि समीरला समोरच्या सीटवर बसायला जागा मिळाली. त्याच्या समोरच तिथे एक वृद्ध गृहस्थ बसले होते. त्यांचं व्यक्तिमत्व त्या गर्दीतही उठून दिसत होतं. स्वच्छ पांढरी दाढी, डोळ्यांवर जाड भिंगाचा चश्मा आणि अंगात एक जुना पण इस्त्री केलेला नेहरू शर्ट. त्यांच्या हातात एक जाडजूड पुस्तक होतं, ज्याचं कव्हर पिवळं पडलं होतं.
त्यांचं नाव होतं विनायकराव.
विनायकरावांनी अचानक पुस्तक बाजूला ठेवलं आणि वर पाहिलं. त्यांची आणि समीरची नजरानजर झाली. विनायकरावांच्या चेहऱ्यावर एक असं स्मित उमटलं, जणू काही ते समीरला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होते. ते हसू उपरोधिक नव्हतं, तर त्यात एक प्रकारची 'आश्वस्तता' होती.
समीरला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याला ती विचित्र भावना जाणवली "अरे, या माणसाला मी आधी कुठेतरी पाहिलंय का?" त्याच्या डोळ्यांसमोर काही अस्पष्ट चित्रं नाचू लागली एक जुनं ग्रंथालय, पावसाची रिपरिप आणि कोणाशी तरी केलेली तासनतास चर्चा. पण हे सगळं कधी घडलं? समीरला तर आठवत नव्हतं.
समीरने संकोच सोडून विचारलंच, "काका, माफ करा... पण आपण आधी भेटलो आहोत का? तुमची ओळख अवघ्या पाच मिनिटांची आहे, पण मला असं खूप प्रकर्षाने वाटतंय की मी तुम्हाला कित्येक वर्षांपासून ओळखतोय."
बाजूला उभा असलेला अविनाश फोन बाजूला ठेवून समीरकडे वेड्यासारखा बघू लागला. "काय रे समीर? उन्हाचा फटका बसलाय का तुला? कोणालाही काय विचारतोयस?"
पण विनायकरावांनी समीरकडे पाहून मान डोलवली. त्यांनी त्यांचं पुस्तक मिटलं. मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं— 'Psychology and the Unconscious' by Carl Jung.
विनायकराव शांत आवाजात म्हणाले, "समीर, हे काही निव्वळ योगायोग नाहीत. माणसाचं मन हे एखाद्या समुद्रासारखं असतं, आपल्याला फक्त वरच्या लाटा दिसतात, पण तळाशी काय दडलंय हे कोणालाच ठाऊक नसतं.
ट्रेनने वेग धरला होता. विनायकराव आता समीरला नव्हे, तर त्याच्या अंतर्मनाला सांगत होते.
"समीर, कार्ल जुंग हा माझा एक आवडता 'तत्वज्ञानी' आहे. त्याने मानवी आत्म्याची अशी काही रहस्यं शोधून काढली आहेत की ती ऐकली की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तो म्हणायचा की, आपल्या प्रत्येकाकडे एक वैयक्तिक मन असतंच, पण त्याखाली एक 'Collective Unconscious' (सामूहिक अबोध मन) असतं. हे मन संपूर्ण मानवजातीला एकमेकांशी जोडतं."
विनायकरावांनी समीरच्या डोळ्यांत पाहिलं. "जेव्हा तुला असा भास होतो की तू मला आधीपासून ओळखतोस, तेव्हा तुझं हे 'सामूहिक अबोध मन' जागं झालेलं असतं. आपण ज्यांना भेटतो, ते फक्त हाडामासाचे चेहरे नसतात. कधीकधी दोन आत्मे एकमेकांना अशा एका स्तरावर ओळखतात, जिथे काळ, वेळ आणि हे शरीर— यांचं काहीच बंधन नसतं."
अविनाशला हे सगळं काहीतरी 'टाईमपास' वाटत होता. तो म्हणाला, "काका, हे सगळं पुस्तकी बोलणं झालं. प्रॅक्टिकली बघा, आपण मुंबईकर आहोत. आपल्याला वेळेची किंमत आहे."
विनायकराव हसले. "अविनाश, वेळ ही देखील मनाचीच एक धारणा आहे. समीरला जे जाणवलं, ती 'Synchronicity' (समकालिकता) आहे. दोन घटना जेव्हा विनाकारण पण अर्थपूर्ण पद्धतीने एकत्र येतात, तेव्हा त्याला योगायोग म्हणता येत नाही. समीर, तुला माझ्यात तुझ्याच अस्तित्वाचा एखादा तुकडा दडलेला दिसलाय, म्हणून तुला मी ओळखीचा वाटतोय."
ट्रेन मरिन लाईन्सला पोहोचणार होती, इतक्यात अचानक ट्रेनला एक मोठा झटका बसला. लोक एकमेकांवर पडले. लाईट्स गेले आणि ट्रेन एका अंधाऱ्या बोगद्यात थांबली. लोक ओरडू लागले. बाहेर पावसाची चाहूल लागली होती, अचानक आलेल्या वादळामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला होता.
लोकलमध्ये अंधार होता. लोकांमध्ये घबराट पसरली होती. पण त्या अंधारातही विनायकराव शांत होते. त्यांनी आपला मोबाईलचा फ्लॅश चालू केला.
"घाबरू नका," विनायकराव शांतपणे म्हणाले. "हा काळ थांबलेला नाही, तर हा काळ आपल्याला स्वतःकडे बघण्याची संधी देत आहे."
अंधारात समीरला विनायकरावांचा आवाज अजूनच जवळचा वाटू लागला. त्याला आठवलं— लहानपणी तो एका अपघातात अडकला होता, तेव्हा एका अनोळखी माणसाने त्याला वाचवलं होतं. त्या माणसाचा चेहरा अंधुक होता, पण त्या माणसाचा स्पर्श आणि आज विनायकरावांचा आवाज यात कमालीचं साम्य होतं.
"काका," समीर चाचरत म्हणाला, "२० वर्षांपूर्वी... महाडचा तो पूल कोसळला होता... तुम्ही तिथे होता का?"
विनायकरावांनी फक्त स्मितहास्य केलं. त्यांनी उत्तर दिलं नाही, पण त्यांच्या डोळ्यांतली चमक सर्व काही सांगून गेली. समीरला जाणवलं की, हे नातं आजचं नाही. हे नातं त्या दिवसापासूनच जोडलं गेलं होतं, जेव्हा एकाने दुसऱ्याला जीवनदान दिलं होतं. आज फक्त त्या ऋणाची आठवण करून देणारा तो क्षण होता.
अर्ध्या तासानंतर ट्रेन पुन्हा सुरू झाली आणि हळूहळू चर्चगेट स्टेशनवर पोहोचली. मुंबईचा तोच आरडाओरडा पुन्हा सुरू झाला. गर्दीचा लोंढा प्लॅटफॉर्मवर उतरला.
विनायकराव उभे राहिले. त्यांनी समीरच्या खांद्यावर हात ठेवला. "काही नाती पाच मिनिटांत तयार होत नाहीत समीर, ती फक्त पाच मिनिटांत पुन्हा गवसतात. आज तुझा आणि माझा संवाद संपला नाही, तर तो एका नवीन वळणावर आला आहे. तू ज्या माणसांना 'फाईली' समजतोस, त्यांच्याकडे एकदा नीट बघ. प्रत्येकाकडे तुझं काहीतरी ऋण दडलेलं असेल."
विनायकराव गर्दीत मिसळले आणि क्षणार्धात दिसेनासे झाले. समीर तिथेच उभा राहिला. त्याच्या बाजूला असलेला अविनाश आता शांत झाला होता.
"समीर... ते काका कोण होते?" अविनाशने आश्चर्याने विचारलं.
"ते एक आरसा होते अविनाश... ज्याने मला माझंच रूप दाखवलं," समीर म्हणाला.
समीरने आज पहिल्यांदाच त्या गर्दीकडे वैतागून पाहिलं नाही. त्याने प्रत्येक चेहऱ्याकडे कुतूहलाने पाहिलं. त्याला जाणवलं की, मुंबईची ही लोकल फक्त डबे ओढत नाहीये, तर ती हजारो वर्षांचा इतिहास आणि एकमेकांशी जोडलेले आत्मे वाहून नेत आहे.
त्याने खिशातून फोन काढला आणि बॉसला मेसेज केला— "आजचं प्रेझेंटेशन मी वेगळ्या पद्धतीने मांडणार आहे. आज आपण माणसांच्या मनात शिरणार आहोत, 'प्रॉडक्ट्स' मध्ये नाही."
समीर आता स्टेशनच्या बाहेर आला. पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले होते. त्याला फेसबुक वर कोठेतरी एक वाक्य दिसले — "The meeting of two personalities is like the contact of two chemical substances: if there is any reaction, both are transformed." (दोन व्यक्तिमत्त्वांची भेट ही दोन रसायनांच्या संपर्कासारखी असते: जर काही प्रक्रिया झाली, तर दोघेही बदलून जातात.)
आज समीर बदलला होता. मुंबईच्या त्या अथांग गर्दीत त्याला आता एकटेपणा वाटत नव्हता. कारण त्याला समजलं होतं की, कदाचित या गर्दीत अजून एखादा 'जुना ओळखीचा' चेहरा दडलेला असेल, जो फक्त एका नजरेची वाट बघत असेल.
समीरच्या आयुष्यातला तो प्रवास तिथेच थांबला नव्हता. चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पडल्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरींनी समीरच्या मनातील विचारांना एक नवी धुमारे फोडले होते. पण नियतीचा खेळ अजून बाकी होता. 'सिंक्रोनिसिटी'चा अनुभव त्याला पुन्हा एकदा येणार होता.
विनायकरावांना भेटून आता आठवडा उलटला होता. समीरच्या कामात आता एक वेगळीच स्पष्टता आली होती. पण एक प्रश्न त्याला सतावत होता— विनायकराव त्या महाडच्या अपघाताबद्दल काहीच का बोलले नाहीत? फक्त स्मितहास्य करून ते निघून का गेले?
त्याच शुक्रवारी समीरला ऑफिसच्या कामासाठी 'टाटा मेमोरियल हॉस्पिटल' मध्ये जावे लागले. एका सामाजिक जाहिरातीच्या निमित्ताने तो तिथे काही डॉक्टरांच्या मुलाखती घ्यायला गेला होता. काम संपवून बाहेर पडत असतानाच, कॅन्टीनच्या बाहेरील बाकावर त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला.
ती होती तन्वी. समीरची कॉलेजमधील मैत्रीण, जिच्याशी त्याचं बोलणं गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे तुटलं होतं. तन्वी तिथे रडत बसली होती.
समीर तिच्या जवळ गेला. "तन्वी? तू इथे, काय झाले , इथे काय करतेयस?"
तन्वीने दचकून वर पाहिलं. तिचे डोळे सुजले होते. "समीर? अरे, माझे वडील... त्यांना हार्ट अटॅक आलाय. अतिदक्षता विभागात (ICU) आहेत ते."
समीर तन्वीला धीर देऊ लागला. गप्पांच्या ओघात त्याला समजलं की तन्वीचे वडील म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून, समीरच्या आयुष्यातले तेच 'गूढ' गृहस्थ— विनायकराव होते!
समीरच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने धावत ICU च्या काचेतून आत पाहिलं. विनायकराव तिथे मशीनच्या विळख्यात शांत झोपले होते. ज्या माणसाने आठवड्यापूर्वी समीरला जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं होतं, तोच माणूस आज मृत्यूशी झुंज देत होता.
समीरने तन्वीला विचारलं, "काका महाडच्या पुलाच्या दुर्घटनेत होते का?"
तन्वीने आश्चर्यचकित होऊन पाहिलं. "हो, तुला कसं माहीत? बाबा तेव्हा तिथे बचाव पथकात स्वयंसेवक म्हणून गेले होते. त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते, पण त्या घटनेबद्दल ते कधीच कोणाशी जास्त बोलत नसत. ते म्हणायचे की, 'ज्यांचे प्राण वाचले, त्यांच्याशी माझं रक्ताचं नाही तर आत्म्याचं नातं आहे.'"
समीरला आता त्याच्या त्या शब्दांचा खरा अर्थ उमजला. "सामूहिक अबोध मन" केवळ विचारात नसतं, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणि ऋणानुबंधात असतं.
त्या रात्री समीर हॉस्पिटलमध्येच थांबला. विनायकरावांची प्रकृती खालावत होती. डॉक्टरांनी आशा सोडली होती. समीर विनायकरावांच्या बेडपाशी गेला. त्याने त्यांचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला.
"काका, तुम्ही म्हणाला होता ना की दोन आत्मे एका स्तरावर एकमेकांना ओळखतात? मग आज असं मध्येच सोडून कसं चालेल? मला अजून खूप काही शिकायचं आहे तुमच्याकडून," समीर पुटपुटला.
समीरने विनायकरावांच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हटलं, "काका, मी तोच समीर आहे... ज्याला तुम्ही २० वर्षांपूर्वी त्या चिखलातून बाहेर काढलं होतं."
आणि एक चमत्कार घडला. मॉनिटरवरच्या हृदयाच्या ठोक्यांच्या रेषा ज्या स्थिर होत होत्या, त्या अचानक पुन्हा नाचू लागल्या. विनायकरावांच्या हाताच्या बोटांनी समीरच्या हाताला हलकासा दाब दिला. त्यांनी डोळे उघडले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर तेच चिरपरिचित, शांत स्मित उमटलं.
दोन आठवड्यांनंतर, विनायकराव डिस्चार्ज घेऊन घरी आले होते. समीर आता त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग झाला होता. विनायकरावांच्या घराच्या बाल्कनीतून समुद्र दिसत होता. मे महिन्याचा उकाडा संपून आता पावसाळ्याची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.
"समीर," विनायकराव चहाचा कप हातात घेत म्हणाले, "जुंग म्हणायचा की, जोपर्यंत आपण आपल्या आत्म्याच्या अस्तिस्वाला स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण पूर्ण होत नाही. तू त्या दिवशी ट्रेनमध्ये मला ओळखलं, कारण तू स्वतःला ओळखायला सुरुवात केली होतीस."
समीरने विचारलं, "पण काका, तुम्ही मला ओळखलं होतं का?"
विनायकराव हसले. "मी तुला २० वर्षांपूर्वीच ओळखलं होतं, बाळा. जेव्हा मी तुला त्या ढिगाऱ्याखालून काढलं होतं, तेव्हा तुझ्या डोळ्यात जगण्याची जी जिद्द होती, तीच जिद्द मला त्या दिवशी लोकलच्या गर्दीत पुन्हा दिसली. फक्त तू त्या गर्दीत हरवला होतास."
आज समीर पुन्हा चर्चगेट लोकलमध्ये उभा होता. गर्दी तशीच होती, उकाडाही तसाच होता. पण आज समीरच्या हातात लॅपटॉप बॅग नव्हती, तर तत्त्वज्ञानाचे तेच पुस्तक होतं जे विनायकरावांनी त्याला भेट दिलं होतं.
त्याच्या बाजूला एक तरुण मुलगा वैतागून फोनवर ओरडत होता. समीरने त्याच्याकडे पाहून फक्त एक आश्वासक स्मित केलं. त्या मुलाने गोंधळून समीरकडे पाहिलं.
समीरच्या मनात विचार आला— कदाचित या मुलालाही वाटत असेल की मी याला कुठेतरी पाहिलंय. कदाचित आज मी कोणासाठी तरी 'विनायकराव' होणार होतो.
कारण नाती पाच मिनिटांत तयार होत नाहीत, ती फक्त योग्य वेळी पुन्हा गवसतात.
खूप सुंदर
ReplyDelete